Edition

शिराळ्यात ‘युवा गर्जना-2026’ वक्तृत्व स्पर्धेचा दिमाखदार समारोप; श्रेया कांबळे व सुफिया नायकवडी प्रथम..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी : माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा गर्जना-2026’ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा अंतिम फेरी व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कनिष्ठ गटात श्रेया शिवाजी कांबळे (इंगरूळ) हिने तर वरिष्ठ गटात सुफिया इस्माईल नायकवडी (चरण) हिने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना कवी नितीन चंदनशिवे, जिल्हा परिषद सदस्य व विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तालुक्यातील कोकरूड, पाडळी आणि चिखली या तीन विभागांत झालेल्या प्राथमिक फेरीत तब्बल २७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातून अंतिम फेरीसाठी कनिष्ठ गटातील १० आणि वरिष्ठ गटातील ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विराज नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि संवादकौशल्य विकसित व्हावे तसेच नवी पिढी सक्षम, सजग आणि शिक्षणाने समृद्ध व्हावी हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे सांगितले.
अंतिम फेरीत स्पर्धकांनी वाढती व्यसनाधीनता, सामाजिक विषमता, लोकशाही, संविधान, सैन्यातील जवानांचे जीवन, शिक्षण, संस्कृती, युवा पिढीची अवस्था आणि राजकारणातील नैतिकता अशा विविध सामाजिक विषयांवर प्रभावी मांडणी केली. परीक्षक म्हणून प्रा. नीता जोखे-आडके, प्रा. मांतेश हिरेमठ आणि प्रा. प्रकाश दुकळे यांनी काम पाहिले.
कनिष्ठ गटातील विजेते :
प्रथम – श्रेया शिवाजी कांबळे (इंगरूळ), द्वितीय – आदिती सुनील पाटील (पाडळी), तृतीय – अनुष्का अरविंद पाटील (शिराळा), चतुर्थ – शिवांश प्रमोद पाटील (पाडळेवाडी), पाचवा – वेदांती शरद खोत (देववाडी).
वरिष्ठ गटातील विजेते :
प्रथम – सुफिया इस्माईल नायकवडी (चरण), द्वितीय – अमृता चंद्रकांत शिंगटे (शिंगटवाडी), तृतीय – सायली माणिक मोहिते (मांगले), चतुर्थ – पूनम दादासो सावंत (चिखलवाडी), पाचवा – सई राजेंद्र पाटील (रिळे).
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक, स्पर्धक आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय थोरबोले यांनी केले, तर आभार युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!