गांधीनगर: प्रतिनिधी
उदय साळुंखे, सरनोबतवाडी ता. करवीर येथे मंगळवारी रात्री उशिरा कचरा टाकणाऱ्या टेम्पो चालकाला पकडून त्याच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेली बरेच दिवस महामार्ग लगत असणाऱ्या गावांभोवती शहरातून येऊन रात्री उशिरा कचरा टाकण्याचा प्रकार चालू होता. सरनोबतवाडी ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत मंगळवारी कचरा टाकताना एकाला पकडून दंडात्मक कारवाई केली. यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
तोहीत वडगावे हा जवाहरनगर येथील रहिवासी असून टेम्पोतून कचरा घेवून सरनोबतवाडी येथे रस्त्याच्या कडेला टाकताना ग्रामस्थ व ग्रा. पंचायत कर्मचारी यांच्या सतर्कतेने पकडण्यात आला. त्याच्यावर ५००० रू दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यासाठी योगीराज आडसूळ, मुकुंद कांबळे, किरण आडसूळ, बाळकृष्ण खोत, विजय कांबळे, योगेश आडसूळ, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय धनगर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कारवाई केली. यापुढे ग्रामपंचायत हद्दीत कचरा टाकल्यास आणखीन कडक दंडात्मक कारवाई करणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय धनगर यांनी सांगितले.











