सांगली प्रतिनिधी – वाळवा तालुका हा स्वातंत्र्यलढ्यात हुतात्म्यांचे बलिदान लाभलेला क्रांतिकारकांचा आहे. अशा पवित्र भूमीवर जनतेची कोणतीही मागणी नसताना हुकूमशाही पद्धतीने ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादला जात आहे,असा घणाघाती आरोप शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते बी. जी. पाटील यांनी केला आहे.
आज जुनेखेड येथील आयोजित संघर्ष समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत प्रशासनाच्या दडपशाहीवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडून आलेल्या नोटिसा फाडून टाकत आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.बोरगाव येथून शेतकऱ्यांनी काढलेली मोटरसायकल रॅली ही केवळ जनजागृतीसाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा दावा समितीने केला आहे.
या कारवाईवरून सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या कार्यपद्धतीवर बैठकीत कडक शब्दांत टीका करण्यात आली.आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेली ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून लोकशाही आणि संविधानाच्या भावनेला धरून नाही. पोलिसांनी आणि प्रशासनाने सत्ताधाऱ्यांचे हुजरे म्हणून काम न करता, सामान्य जनतेचे सेवक म्हणून निष्पक्षपणे काम करावे,असे आवाहन बी. जी. पाटील यांनी केले.बैठकीत आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सुपीक जमिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या महामार्गाला आमचा विरोध कायम राहील शेतकऱ्यांच्या संविधानिक हक्कांवर किंवा त्यांच्या स्वाभिमानावर यापुढे आघात करण्याचा प्रयत्न झाल्यास, संपूर्ण जिल्ह्यात लोकशाही मार्गाने तीव्र संघर्ष छेडला जाईल. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता एक इंचही जमीन महामार्गासाठी दिली जाणार नाही.या बैठकीला जुनेखेड सह परिसरातील शेतकरी, संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या दडपशाहीमुळे आता शक्तिपीठ महामार्गाविरोधातील हे आंदोलन आगामी काळात अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











