Edition

पंचगंगा धोक्याच्या दिशेने; २४ तासांत ९ फुटांची वाढ, २० बंधारे पाण्याखाली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर | प्रतिनिधी

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या २४ तासांत पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तब्बल ९ फुटांची वाढ होऊन शनिवारी मध्यरात्री ती २६ फूट २ इंचांवर पोहोचली. रात्री साडेअकराच्या सुमारास नदीचे पाणी घाटावरील मारुती मंदिराच्या पायरीला लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नदीकाठच्या गावांतील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

गत २४ तासांत जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकूण ५९५ मि.मी., तर १६ धरण क्षेत्रांत २,१७० मि.मी. पावसाची नोंद झाली. शहरात ४८.३ मि.मी. पाऊस झाला असून अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले. हवामान विभागाने रविवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील २४ तासांतही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

राधानगरी, सरवडे, कसबा वाळवे, आवळी, गगनबावडा, साळवण, सांगरुळ, बालिंगे, कोडोली, पडळ, कोतोली, भेडसगाव, बांबवडे, सरुड, मलकापूर, आंबा, नेसरी, आजरा, मलिग्रे, वठार आणि बिद्री या २२ ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. विशेषतः राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पाच घरांचे नुकसान झाले. पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि बोरपाडळे येथे तीन घरांच्या भिंती कोसळल्या, तर आजरा तालुक्यात मेंढोली आणि आजरा येथे दोन घरांच्या भिंती पडल्या. गवसे येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, पंचगंगा, कासारी, वारणा, कडवी, भोगावती आणि कुंभी नद्यांवरील एकूण २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!