
चिकोडी प्रतिनिधी.
चिक्कोडी तालुक्यातील विश्वदर्शन न्यूज या खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार अजित खोत यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज चिक्कोडी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकार समाजात घडणाऱ्या अन्याय, भ्रष्टाचार व विविध समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत असतात. बातम्या संकलित करण्यासाठी पत्रकार जीवाची पर्वा न करता विविध ठिकाणी जाऊन आपली जबाबदारी पार पाडतात. मात्र, अलीकडील काळात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
काल चिक्कोडी तालुक्यातील खजगौडनहट्टी गावात जमिनीच्या वादातून मास्ती कुटुंबीयांमध्ये झालेल्या मारामारीची घटना कव्हर करण्यासाठी गेलेल्या विश्वदर्शन न्यूज चॅनेलचे पत्रकार अजित खोत यांच्यावर दुंदप्पा, लगमन्ना व मुथन्ना मास्ती या तिघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अजित खोत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत चिक्कोडी पत्रकार संघाने तहसीलदार, सहाय्यक आयुक्त (एसी), जिल्हाधिकारी (डीसी) तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे संबंधित हल्लेखोरांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, पत्रकारांना आवश्यक संरक्षण उपलब्ध करून द्यावे आणि पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकारांवरील हल्ले तात्काळ थांबवून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार आणि विविध माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.











