Edition

गांधीनगरातील ऑनलाइन बेटिंग, गांजा-दारू विक्री व गुन्हेगारीवर तात्काळ कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन – अविनाश शिंदे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर,: प्रतिनिधी
उदय साळुंखे, दि. २२ : गांधीनगर परिसरात वाढत चाललेली ऑनलाइन बेटिंग, मटका, गावठी दारू विक्री, गुटखा विक्री, चरस-गांजा तस्करी तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बेकायदेशीर प्रकारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिला आहे.

नुकत्याच गांधीनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांचे स्वागत करताना अविनाश शिंदे यांनी परिसरातील गंभीर समस्या मांडल्या. त्यांनी सांगितले की, गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी व्यापारपेठ असून येथे मोठ्या प्रमाणात युवक, महिला व नागरिक रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने येत असतात. मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

ऑनलाइन बेटिंगच्या व्यसनामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गावठी दारू, मटका, गुटखा आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीमुळे युवकांचे जीवन उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिक संकटात सापडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गांभीर्याने उपस्थित करत, कामानिमित्त गांधीनगरमध्ये येणाऱ्या महिलांवर काही व्यापाऱ्यांकडून गैरवर्तन व विनयभंगाच्या घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले फ्लेक्स बोर्ड, ट्रान्सपोर्ट लाईनमधील वाहतूक कोंडी आणि अनियंत्रित पार्किंग यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

“गांधीनगरमधील ऑनलाइन बेटिंग, मटका, अंमली पदार्थांची विक्री, गावठी दारू आणि गुटखा विक्रीवर तात्काळ बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिला.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे *अमर कांबळे, गजेंद्र कांबळे, अविभाऊ कांबळे ,योगेश आजाटे ,नितीन कांबळे, मनोहर कांबळे, किरण कांबळे, विकास कांबळे, रजत कांबळे, संकेत कोठावळे, तुषार सावंत, रवी कांबळे ,चेतन कांबळे विशाल कांबळे, यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!