म्हैसही भाजली; तीन घरांचे नुकसान, सुमारे तीन लाख रुपयांची हानी
वाशिम, दि. 18 जून (जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव) : रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे गुरुवारी (दि. 18) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस गळतीमुळे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील दोन जण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले असून एका म्हशीलाही आगीची झळ बसून दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित घरातील एलपीजी गॅस यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गॅस गळती झाली. त्यानंतर अचानक आग भडकून घरात एकच गोंधळ उडाला. आग विझविण्याच्या प्रयत्नात घरातील सदस्य भाजले गेले. या दुर्घटनेत तीन घरांचे अंशतः नुकसान झाले असून घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच एका म्हशीलाही आगीमुळे दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका सेवा तसेच शिरपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित यंत्रणांनी तातडीने बचाव आणि मदतकार्य हाती घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांमध्ये एलपीजी गॅस विमा आणि नुकसानभरपाईबाबत चर्चा सुरू असून प्रशासनाकडून आवश्यक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना एलपीजी गॅसचा वापर करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
चौकट
एलपीजी वापरताना घ्या ही काळजी
गॅस रेग्युलेटर व पाईपची नियमित तपासणी करावी.
गॅसचा वास आल्यास त्वरित रेग्युलेटर बंद करावा.
विद्युत स्विच किंवा मॅचस्टिकचा वापर टाळावा.
घरातील खिडक्या-दारे उघडी ठेवावीत.
अधिकृत तंत्रज्ञांकडूनच दुरुस्ती करून घ्यावी.











