Edition

म्हसोबा चौकातील पीएमश्री न्यू प्रशाला स्थलांतर रद्द करण्याची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

उपजिल्हाधिकारी सेलू यांच्याकडे मागणी.

सेलू : सेलू येथील म्हसोबा चौकातील पी एम श्री न्यू प्रशाला स्थलांतर करण्याच्या विरोधात आज परिसरातील स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते जयसिंग शेळके सह इतर कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी सेलू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरातील म्हसोबा चौक येथील पीएमश्री न्यू प्रशाला ही नूतन रोडवरील सीपीएस शाळेत स्थलांतरित करण्याच्या संभाव्य हालचालींना तीव्र विरोध करत निवेदन सादर केले.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,शाळा स्थलांतरित केल्यास गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि सुरक्षितेवर परिणाम होणार असल्याने हा प्रस्ताव तात्काळ रद्द करून शाळा पूर्ववत म्हसोबा चौकातच सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
म्हसोबा चौकातील पीएमश्री न्यू प्रशाला ही सुमारे ५० वर्षांपासून परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा असून, स्वतःच्या जागेवर कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी या शाळेचा पीएमश्री योजनेत समावेश झाला असून, शाळेच्या विकासा साठी अंदाजे ७० ते ९० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे समजते. या निधीतून तीन नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम, जुन्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती, कार्यालयाचे नूतनीकरण, फरशी, सीसीटीव्ही यंत्रणा व इतर शैक्षणिक सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. लाखो रुपये खर्च करून शाळेचा विकास करण्यात आला असताना अवघ्या दोन वर्षांत शाळा स्थलांतरित करण्याचा विचार का केला जात आहे, असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.शाळा स्थलांतरित झाल्यास परिसरातील लहान विद्यार्थ्यांना मुख्य रस्ता ओलांडून सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतर जावे लागण्याची शक्यता आहे. या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. परिसरातील बहुतांश पालक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अशा पालकांना दररोज विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे व आणणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे शाळा स्थलांतराचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे का, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.शाळा स्थलांतरा मागील नेमके काय कारण आहे? स्थलांतर करून नवीन निधी आणायचा,प्रस्ताव कोणी मांडला, कोणत्या प्रशासकीय निर्णयाच्या आधारे स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, तसेच पालकांची संमती नेमकी कोणती माहिती देऊन घेण्यात आली, याची सखोल चौकशी करण्यात यावी. पीएमश्री योजनेंतर्गत प्राप्त निधी, मंजूर कामे, प्रत्यक्ष खर्च, बांधकामे व खरेदी यांचा सविस्तर हिशेब सार्वजनिक करावा आणि शाळेवर झालेल्या खर्चाचे प्रत्यक्ष लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.शाळा स्थलांतराचा प्रस्ताव तात्काळ स्थगित करून पीएमश्री न्यू प्रशाला म्हसोबा चौकातच सुरू ठेवावी, निधी खर्चाची पारदर्शक माहिती द्यावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत लेखी खुलासा द्यावा, मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिक व पालकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जयसिंग शेळके, पांडुरंग कावळे, महेश जाधव, किशोर भांडवले, वैभव वैद्य, पराग गोळेगावकर,गोविंद शर्मा, परवेझ सौदागर, गणेश शेवाळे व नागरिक उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!