
प्रतिनिधी प्रविण केर्ले : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसने थेट शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीची करून दिली आठवण
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शरद पवार यांना वयाच्या 85 व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. त्यावेळी स्वतःच्या राज्यसभेच्या जागेवरील दावा बाजूला ठेवून काँग्रेसने पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.
मार्च 2026 मधील राज्यसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे 10 आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे 16, तर शिवसेना ठाकरे गटाकडे 20 आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मागितला होता. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि महाविकास आघाडीने एकमताने पवारांना पाठिंबा दिला.
आता भाजपला पाठिंबा देणार? काँग्रेसचा सवाल
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता सवाल उपस्थित केला आहे. ज्या शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने स्वतःची जागा सोडली, तेच आता मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावर भाजप सरकारला पाठिंबा देणार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला वेग
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे विधान केले होते. मात्र, पक्षातील खासदारांनी अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही विधेयकाचा मसुदा पाहून आणि पक्षात चर्चा करूनच अंतिम भूमिका जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काँग्रेसने या विधेयकाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
महाविकास आघाडीत मतभेद उघड?
एकीकडे भाजपकडून विधेयकासाठी विविध पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने पवारांच्या पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्येच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आता शरद पवार यांची राष्ट्रवादी अधिकृतपणे कोणती भूमिका घेणार आणि काँग्रेसच्या या खोचक पोस्टला काय उत्तर देणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










