डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
‘एक्सलन्स इन कस्टमर सर्व्हिस’ पुरस्काराने नवी दिल्लीत गौरव.
सेलू : ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार सेवा आणि आधुनिक बँकिंगचा प्रभावी संगम साधणाऱ्या देवगिरी नागरी सहकारी बँक लि. ला ‘एक्सलन्स इन कस्टमर सर्व्हिस’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री. सतीश मराठे यांच्या हस्ते, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज (NAFCUB) चे अध्यक्ष श्री. लक्ष्मी दास आणि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष श्री. गौतम ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.बँकेच्या वतीने संचालक श्री. राजेश जैन, अॅडव्होकेट सागर विद्वंस आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दत्ता शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, ग्राहकांचा विश्वास आणि त्यांना दिली जाणारी दर्जेदार सेवा हीच बँकेच्या यशस्वी वाटचालीची खरी ताकद आहे. बदलत्या बँकिंग व्यवस्थेत ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, सेवा अधिक सुलभ व गतिमान करणे आणि ग्राहकांशी विश्वासाचे नाते जपणे याला बँकेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. हा पुरस्कार म्हणजे बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान आणि ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘सहकार से समृद्धी – गव्हर्नन्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड एक्सलन्स’ या संकल्पनेवर आधारित या समिटमध्ये देशभरातील सहकारी बँका आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. ग्राहकसेवेतील उत्कृष्टतेसाठी देवगिरी बँकेची झालेली निवड ही बँकेच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल आहे.या राष्ट्रीय सन्मानामुळे देवगिरी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, भविष्यातही ग्राहकांना अधिक उत्तम आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांनी व्यक्त केला.








