सदलगा प्रतिनिधी अनिलकुमार डेक्कण्णावर, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आर्थिक प्रगती, प्रभावी व्यवस्थापन आणि व्यवसाय वाढीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या बोरगावच्या श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ २०२६’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय सहकार परिषदेच्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सन्मानामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी सहकाररत्न युवा नेते मान्य श्री उत्तम अण्णा पाटील यांनी मान्यवरांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला.
सदस्यांचा विश्वास हीच संस्थेची खरी शक्ती मानून श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे. आर्थिक व्यवहारातील शिस्त, पारदर्शकता, नियोजनबद्ध व्यवस्थापन, ग्राहक केंद्रीत सेवा आणि व्यवसाय वाढीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर संस्थेने आपले कार्यक्षेत्र वाढवत सहकार क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल म्हणून संस्थेला राष्ट्रीय पातळीवरील हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर :- श्री सतीश मराठे (सदस्य, वित्तीय सेवा संस्था ब्युरो, भारत सरकारचे वित्त मंत्रालय), श्री अजय झा (संपादक, इंडियन को-ऑपरेटिव्ह – भारत सहकार), श्री लक्ष्मीदास (अध्यक्ष, नॅफकब – NAFCUB), श्री पंकज बन्सल (अतिरिक्त सचिव, सहकार मंत्रालय, भारत सरकार), श्री डी. के. सिंग (अध्यक्ष, सहकारी निवडणूक प्राधिकरण), श्री यू. एस. अवस्थी (माजी व्यवस्थापकीय संचालक, इफ्को) तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष श्री विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
बोरगावसारख्या ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थेने आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर मिळविलेला हा सन्मान केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपूर्ण बोरगाव आणि परिसरातील सहकार क्षेत्रासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.
यावेळी संस्थेचे संचालक श्री राजू मगदूम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अशोक बंकापुरे यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बोरगावच्या मातीतून राष्ट्रीय पातळीवर उमटलेला अरिहंतचा यशाचा ठसा म्हणजे विश्वास, गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षम व्यवस्थापनाची सन्माननीय साक्ष !
श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या या अद्भुत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सदस्यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
अनिलकुमार डेक्कण्णवर, सदलगा (NEJ)








