विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी निपाणी.
चिक्कोडी,तालुका येथील सैनिक मलिकवाड गावच्या हद्दीतून एकसंबा नगरपंचायतीच्या प्रस्तावित रिंगरोडला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी मागणी सैनिक मलिकवाड येथील ग्रामस्थांनी केली.
निपाणीत शहर व ग्रामीण योजना खात्याच्या साहाय संचालक यशोदा उळकाशी यांना याबाबतचे आक्षेप नोंदवून निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, सैनिक मलिकवाड गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत, ऐतिहासिक पार्श्वभूमी, सामाजिक व सांस्कृतिक ओळख असून गावातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली गावाची स्वतंत्र ओळख आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर परिणाम करणारे निर्णय घेऊ नयेत. एकसंबा शहरासाठी नियोजित केलेल्या प्रस्तावित रिंगरोडमुळे मलिकवाड गावातील सुपीक शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होऊ शकतात. रिंगरोडसाठी नेमकी किती जमीन संपादित केली जाणार, किती शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल आणि या प्रकल्पाचा गावाला काय फायदा होणार, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. रस्त्यासाठी जमीन गेल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही जमिनींचे तुकडे शेतीसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित रिंगरोडचा मार्ग रद्द करून गावातील कृषिभूमीचे संरक्षण करावे. गावाच्या भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना ग्रामस्थांचे मत, शेतकऱ्यांचे हित आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
चौकट…
ग्रामसभेतील विरोधाची दखल घ्यावी
१८ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत रिंगरोड आणि नगरपंचायत हद्दवाढ या दोन्ही प्रस्तावांविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. या आक्षेपांची अधिकृत नोंद घेऊन ग्रामस्थांच्या भूमिकेचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.










