रायबाग : जैन समाजातील गुणवंत, प्रतिभावान आणि कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना ओळखून त्यांच्या यशाचा गौरव करण्याचे कार्य अरिहंता चॅरिटेबल फाऊंडेशनकडून केले जात आहे. फाऊंडेशनचे हे कार्य कौतुकास्पद असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षिका डॉ. भारती सवदत्ती यांनी केले.
नगर येथील महावीर समुदाय भवन येथे रविवारी अरिहंता चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित बाराव्या वर्षातील तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण समारंभाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना डॉ. सवदत्ती म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने इतर विद्यार्थ्यांनाही प्रगतीची प्रेरणा मिळते. प्रतिभावान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणे आवश्यक आहे. जैन समाजातील दानधर्म, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेची परंपरा संपूर्ण देशासाठी आदर्शवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष डी. सी. सदलगी होते. यावेळी त्यांनी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे आणि सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या देणगीदारांचा सन्मान करणे, हा फाऊंडेशनचा प्रमुख उद्देश आहे.
गुणवंतांचा गौरव; देणगीदार दाम्पत्याचा सत्कार
कार्यक्रमात पुरस्कारासाठी योगदान देणारे डॉ. अजित नाईक आणि शोभा नाईक या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. अजिता नाईक यांना ‘वैद्यरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सुवर्णपदक विजेत्या पूनम हंजे आणि सौम्या शेट्टी, केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी अमृता चौघुले, शिक्षिका परिस गौडाकेनचक्कगोला तसेच एलएलबी पदवी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
जैन समाजातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संजय बदोरे, सचिव मल्लाप्पा खानट्टी, संचालक इरगौडा पाटील, दशरथ शेट्टी, शीतल बेदीकिहाळे, संजय हंजे, परिसा उगरे, भरतेश पाटील, नेमिनाथ आस्की, वर्धमान बनवणे, युवा धुरिण धुलागौडा पाटील, माजी अध्यक्ष टी. पी. सुजाता पाटील, जयपाल बनवणे यांच्यासह जैन समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.










