
पुणे, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी अॅड. एम. डी. देशमुख यांनी मंगळवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पदवीधरांच्या प्रश्नांना स्वतंत्र आणि प्रभावी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. कायद्याच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, माजी न्यायाधीश (ग्राहक न्यायालय) म्हणून बजावलेली जबाबदारी तसेच सामाजिक व सार्वजनिक जीवनातील अनुभवाच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांचे संरक्षण, संविधानिक विचारांची जपणूक, पारदर्शक सार्वजनिक जीवन आणि पदवीधरांच्या विकासात्मक प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका अॅड. देशमुख यांनी मांडली.
‘स्वतंत्र रोजगार नीती’ला प्राधान्य
पदवीधर युवक-युवतींसाठी रोजगार व करिअरच्या संधी हा आपल्या निवडणूक भूमिकेतील प्रमुख विषय असल्याचे अॅड. देशमुख यांनी स्पष्ट केले. उच्च शिक्षणानंतर शाश्वत रोजगाराच्या संधी, कौशल्यविकास, उद्योजकता व स्वयंरोजगाराला प्रोत्साहन, बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत व्यावसायिक प्रशिक्षण, महिला पदवीधरांचे आर्थिक व व्यावसायिक सक्षमीकरण तसेच उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती या विषयांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानपरिषदेत निवडून आल्यास ‘स्वतंत्र रोजगार नीती’ या विषयावर सभागृहात आपला पहिला प्रश्न उपस्थित करून त्यावर व्यापक धोरणात्मक चर्चा घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सुशिक्षित युवकांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी राज्याला दीर्घकालीन, सर्वसमावेशक आणि स्वतंत्र रोजगार धोरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘ही उमेदवारी कोणाच्याही विरोधासाठी नाही’
आपल्या उमेदवारीची भूमिका स्पष्ट करताना अॅड. देशमुख म्हणाले, “माझी उमेदवारी कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाच्या विरोधासाठी नाही. पदवीधरांच्या न्याय्य आणि मूलभूत प्रश्नांना महाराष्ट्र विधानपरिषदेत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी आवाज मिळावा, या सकारात्मक आणि विधायक भूमिकेतून मी निवडणूक लढवत आहे. कोणावरही वैयक्तिक टीका न करता माझा अनुभव, कार्यक्षमता, वैचारिक भूमिका आणि विकासाची दिशा मतदारांसमोर मांडणार आहे.”
गेल्या काही काळात पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष दौरे करून पदवीधर मतदार, वकील, डॉक्टर, शिक्षक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध व्यावसायिकांशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. या संवादातून रोजगार, शिक्षण, व्यावसायिक संधी आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न समोर आले असून त्यांचा धोरणात्मक पातळीवर पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
“पदवीधर मतदार हा सुशिक्षित, विचारी आणि विवेकी मतदार आहे. त्यामुळे तात्कालिक राजकीय समीकरणांपेक्षा उमेदवाराची सचोटी, विश्वासार्हता, अनुभव, वैचारिक प्रगल्भता आणि प्रश्न सोडविण्याची क्षमता यांचा तो विचार करेल,” असा विश्वास अॅड. देशमुख यांनी व्यक्त केला.
लोकशाही मूल्ये, संविधानिक विचार आणि विधायक सार्वजनिक जीवन यांवर विश्वास ठेवून पदवीधरांचा अभ्यासपूर्ण व शालीन आवाज महाराष्ट्र विधानपरिषदेत पोहोचविण्याचा संकल्प केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.











