Edition

१५ ऑक्टोबरला साखर कारखाने सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर / प्रतिनिधी : केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, गाळप हंगाम लवकर सुरू केल्यामुळे ऊसाची रिकव्हरी तसेच वजनात घट होऊन शेतकरी आणि साखर उद्योगाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडे केली.

देशहितासाठी गाळप हंगाम लवकर सुरू करणे आवश्यक असल्यास त्यातून शेतकरी व साखर उद्योगाला होणाऱ्या संभाव्य नुकसानीवर केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रितपणे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ५० रुपये करावा, सी-हेवी इथेनॉलचा दर ७० रुपये प्रतिलिटर करावा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच खासगी व सहकारी साखर कारखान्यांना नाबार्ड, एसडीएफ फंड किंवा एनसीडीसीच्या माध्यमातून वार्षिक चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या मागण्यांसाठी २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकरी व साखर उद्योगाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि त्यानंतरच १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली.

याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील विविध साखर कारखानदारांच्या भेटी घेतल्या. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार जयंत पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन खासदार विशालदादा पाटील तसेच पतंगरावजी कदम सोनहिरा साखर कारखान्याचे आमदार विश्वजीत कदम यांची त्यांनी भेट घेऊन साखर उद्योग व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली.

यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी,स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे भागवत जाधव,संदीप राजोबा, संजय बेले, बाबासाहेब सांद्रे, प्रकाश देसाई, मनोहर पाटील, बाळासाहेब शिंदे, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील, श्रीहंश पाटील, वैभव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!