
डॉ शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे शनिवारी (दि. 12 सप्टेंबर 2026) करिअर स्किल डिस्कव्हरी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘No Bag School – Learn Beyond Books’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या पलीकडील प्रत्यक्ष जीवनातील कौशल्यांचा अनुभव देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय रोडगे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, जीवनकौशल्ये, आर्थिक साक्षरता आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून देत भविष्याभिमुख शिक्षणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून प्रतिष्ठित उद्योजक श्री. पियुष बिनायके यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय, उद्योजकता, नेतृत्वगुण आणि आर्थिक नियोजन याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त, मेहनत आणि दूरदृष्टी यावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी विद्यार्थ्यांसाठी सुतारकाम (Carpentry) आणि शिवणकाम (Tailoring) यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. सुतारकाम व शिवणकाम कसे केले जाते, त्यासाठी कोणती साधने वापरली जातात आणि या व्यवसायांमध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तसेच इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि आर्थिक साक्षरता (Financial Literacy) सत्र आयोजित करण्यात आले. इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि वॉटर फिल्टर प्रकल्पाला शैक्षणिक भेट देत जीवनाशी निगडित विविध सेवांची माहिती घेतली. यावेळी मंचावर संस्थेचे सदस्य डॉ आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे,प्राचार्य सुबोध हिवराळे, अनिल कुमार आणि मीरा मिरांडा यांची प्रमुख उपस्थिती होती.











