
डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय व उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न केला.
समाजाच्या प्रति सदैव निष्ठा ठेवावी, तसेच समाजसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. संजय रोडगे सर यांच्या प्रेरणेने सदरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजाचे रक्षण व सेवा करणाऱ्या पोलीस बांधवां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमास सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अरुण नागरे साहेब व पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. शाकीर शेख साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे, उपमुख्याध्यापक धम्मपाल ठोके, सहशिक्षिका सौ. सुचिता साबळे व सौ. मिताली ढाले यांची उपस्थिती होती.“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य अंगीकारून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण ठरला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, कृतज्ञता व समाजसेवेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.











