

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी, चंदगड तालुक्यातील कानूर खुर्द येथील धनगरवाड्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री. कोंडीबा धोंडीबा येडगे यांच्या शेतात घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर वाघ दिसला. येडगे हे शेतात काम करत असताना त्यांना वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. दिवसाढवळ्या वस्तीपासून इतक्या जवळ वाघ दिसल्याने धनगरवाड्यातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
दरम्यान, घटनास्थळी वाघाच्या पायाचे ठसेही आढळून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे परिसरात वाघाचा वावर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये, तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने परिसरात पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी धनगरवाड्यातील नागरिकांकडून होत आहे.











