
पुणे व सोलापूर रेल्वे मंडळाची विभागीय कार्यालय, पुणे येथे बैठक पार पडली. मंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध रेल्वे प्रश्न, प्रवाशांच्या सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास, नवीन रेल्वे सेवा तसेच प्रलंबित कामांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह हातकणंगले-इचलकरंजी परिसरातील रेल्वे प्रश्न आणि प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या मागण्या रेल्वे प्रशासनासमोर मांडल्या. ज्योतिबा तीर्थक्षेत्रासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासोबतच हातकणंगले-इचलकरंजी रेल्वे मार्ग सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
हातकणंगले परिसरातील रेल्वे वाहतुकीशी संबंधित समस्यांवरही खासदार माने यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. हातकणंगलेजवळ भुयारी मार्गाची निर्मिती करावी तसेच या भुयारी मार्गात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पुणेपर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत वाढविण्याची महत्त्वपूर्ण मागणी खासदार माने यांनी बैठकीत केली. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे मार्गावरील प्रवाशांना मुंबईशी अधिक सुलभ रेल्वे जोडणी मिळावी, यासाठी सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार मुंबईपर्यंत करण्याची मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. बैठकीस केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, खासदार विशाल पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार भास्कर मुरलीधर भगरे, खासदार मेघाताई कुलकर्णी, खासदार ज्योतीताई वाघमारे, खासदार बालाजी काळगे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, उपमहाप्रबंधक किशोर मिश्रा, मध्य रेल्वे प्रबंधक राजेश कुमार वर्मा, महारेलचे प्रबंधक सुजित मिश्रा, प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक प्रभात कुमार, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर यांच्यासह भुवनेय कुमार गुप्ता, अक्षय सक्सेना, मिलिंद हिरवे, अनुप कुमार अग्रवाल, मणिंदर उप्पल, आदित्य कुमार, विवेक सागर, पद्मसिंह जाधव आदी रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने यांनी मांडलेल्या या मागण्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधांना तसेच हातकणंगले-इचलकरंजी परिसरातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.











