रायबाग : तालुक्यातील कंकणवाडी येथील हालसिद्धेश्वर शेतातील घरफोडी चोरीचा गुन्हा रायबाग पोलिसांनी उघडकीस आणला असून, चोरीच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. अप्पय्या सिद्दप्पा दळवाई (वय २७, रा. हालसिद्धेश्वर फार्म, कंकणवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३.५ तोळे सोन्याचे दागिने, त्यामध्ये हार, चेन व कानातील फुले, तसेच १७ हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादीच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून घरातील सर्व सदस्य शेजारच्या घरात गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून पुढील दरवाजाची चावी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून आरोपी पसार झाला होता.
या घटनेप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती व विविध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
अथणी उपविभागाचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोली यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अपर पोलीस अधीक्षक आर.बी., रायबाग पोलीस ठाण्याचे सीपीआय एम.एम. दुप्पीन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
या पथकात एस.एस. अरभवी, सी.बी. पाटील, आरिफ मुद्दल, आर. शनवाड तसेच बेळगाव टेक्निकल सेलचे टी. सचिन पाटील यांनी सहभाग घेतला. पथकाने तत्परतेने तपास करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.











