ईश्वरपूर प्रतिनिधी – अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करून त्याचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रीत करत सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कुरळप पोलिसांनी चार अल्पवयीन व तीन सज्ञान अशा एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पीडित मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरळप पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक 135/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 352, 351(2), 3(5), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) अधिनियम 2012 मधील कलम 8, 9(M), 10, 11(ii), 12, 14, 15, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम 3(1)(R), 3(1)(S), 3(2)(VA), 6 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी सुमारे 3.10 वाजण्याच्या सुमारास गावातील कुस्ती मैदानाजवळील झाडाखाली ही घटना घडली. संशयितआरोपी याने पीडित मुलाने मोठ्याने बोलल्याचा राग मनात धरून इतर आरोपींसोबत संगनमत केले. पीडित मुलगा अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असूनही त्याला कुस्ती मैदानाजवळ नेण्यात आले. तेथे त्याच्यावर लैंगिक स्वरूपाचे कृत्य करण्यात आले, त्याचा मोबाईलवर व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर कुरळप पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार अल्पवयीन आणि तीन सज्ञान संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात व्हिडिओ कसा तयार करण्यात आला, कोणत्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला आणि त्यामागील इतर आरोपी किंवा कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, ईश्वरपूर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अल्पवयीन पीडिताचा समावेश असल्याने कायद्यानुसार त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.











