कोल्हापूर : समस्त लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त लिंगायत समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असून, या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.
समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्व समाजबांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनातून जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा देणे, महामंडळासाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देणे, लिंगायत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृहे व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा निर्माण करणे, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत.
आंदोलन हे कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, शिक्षणाच्या बळकटीसाठी, युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकशाही मार्गाने उभारण्यात आलेले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मागण्या समाजहिताच्या व लोककल्याणकारी असल्याने शासनाने त्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलनास जाहीर पाठिंबा देताना महाराष्ट्र शासनाने समाजाच्या भावना व अपेक्षांचा आदर राखून या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच समाजातील सर्व बांधवांनी हे आंदोलन शांततामय, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने यशस्वी करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
समस्त लिंगायत समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या बेमुदत साखळी उपोषणात आपण कायम समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.











