Edition

भाटशिरगांव येथील आवळ ओढ्यावरील पुलाची दुरुस्ती करा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – भाटशिरगांव (ता. शिराळा) येथे शिराळा- सागांव रस्त्यावरील आवळ ओढ्यावरील पुलावर गेल्या महिनाभरात ३ अपघात झाले असून, या अपघातांमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनांचे नुकसान होऊन मोठी वित्तहानी झाली आहे. या अपघातांमुळे ओढ्यावरील पुलाचे संरक्षक कठडे, रेलिंगही तुटले आहे. भविष्यातही आवळ ओढ्याच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे पत्र भाटशिरगांव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना दिले. यावेळी ग्रामस्थांनी आमदार सत्यजित देशमुख यांची भेट घेऊन पुलाच्या दुरुस्तीबाबतच्या मागण्या कानावर घातल्या.

सदर निवेदनामध्ये पुलाच्या दोन्ही बाजूला योग्य त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, रंबल स्ट्रीप‌ बसवाव्यात, दिशादर्शक फलक, वेग मर्यादा निश्चित करणारे फलक, वाहनधारकांना सुचना देणारे फलक लावावेत. तसेच संरक्षक कठडे आणि रेलिंगची तातडीने दुरुस्ती करावी. पुलावर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान १०० मीटर अंतरात रिफ्लेक्टर बसवावेत. पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यालगतची झाडे तोडावी/ छाटावी. आवळ ओढ्यावरील पुलाच्या बांधकामास जवळपास २५ ते ३० वर्षे झाली आहेत. सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. या रस्त्यावरुन वाढलेली रहदारी, ४ ते ५ साखर कारखान्यांना होत असलेली ऊस वाहतूक, बगॅस वाहतूक तसेच अवजड चिरा वाहतूक पाहता मोठ्या रुंद पुलाचे नव्याने बांधकाम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी पुलाच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीने निर्देश दिले.

याप्रसंगी सरपंच भगवान भंडारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव देसाई, विश्वास देसाई, बाजीराव देसाई, कृषीमित्र अनिल आलुगडे, सर्जेराव सांगळे, संभाजी जगताप, अक्षय सांगुळे, साहील मोरे, विश्वदीप देसाई आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!