Edition

“अधिकाऱ्यांनी नेत्यांचं नव्हे, जनतेचं ऐकावं; महायुती सरकार पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध” – आ. सदाभाऊ खोत..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – ईश्वरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचे’ कौतुक करत विरोधकांवर टीका केली.
खोत म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून ईश्वरपूर परिसरातही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अभियानातून संजय गांधी निराधार योजनेतील लाभधारक, दिव्यांग, महिला शेतकरी यांना विविध लाभ देण्यात आले. तसेच सातबारा दुरुस्ती, वारस नोंदी, सन्मानपत्र वितरण यांसारखी अनेक महसूलविषयक कामे नागरिकांच्या दारात जाऊन करण्यात आली.
यावेळी त्यांनी माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनीही या अभियानाचे आणि महसूल मंत्र्यांच्या कामाचे कौतुक केल्याचा उल्लेख केला. “वीस वर्षे त्यांच्या सरकारच्या काळात महसूल मंत्र्यांचे अभिनंदन करण्याची वेळ आली नव्हती. यावरून महायुती सरकार जनतेसाठी काम करत असल्याचे स्पष्ट होते,” असे खोत म्हणाले.
ईश्वरपूर व आष्टा महसूल विभागात चांगले काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी आ. जयंत पाटील यांनी ईश्वरपूर तहसीलच्या कामकाजावर व्यक्त केलेल्या नाराजीवरही प्रतिक्रिया दिली. “पूर्वी काही अधिकारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत होते. आता अधिकारी कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. जे अधिकारी भीक घालत नाहीत, त्यांना धमक्या देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता सरकार बदलले असून महायुती सरकार पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“अधिकाऱ्यांनी नेत्यांचे नव्हे तर जनतेचे ऐकावे आणि नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, हेच सरकारचे धोरण आहे,” असेही सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!