वाशिम प्रतिनिधी – संतोष भालेराव,
संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान पुणे जिल्ह्य़ातील सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज यांच्या वारीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने दिंडीतील वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार वारकरी गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायासह संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड येथील मुक्काम आटोपून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. यावेळी वारकरी भजन-कीर्तन करत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या कडेला चालत असताना भरधाव ट्रक अचानक दिंडीत घुसल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार वारकरी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात मृत्यू झालेल्या महिला वारकरी मिरज तालुक्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य राबवून जखमींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ट्रकचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राज्यभरातून मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.











