Edition

काळाचा दुसरा घाला: ३५ दिवसांची मृत्यूशी झुंज संपली; रांगोळीतील ‘अर्जुन’ही अनंतात विलीन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

माणकापूर (ता. निपाणी) येथील भीषण अपघात प्रकरणी एक अत्यंत दुःखद अपडेट समोर आली असून, गेल्या ३५ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारा दुसरा विद्यार्थी अर्जुन मिरजे याचीही प्राणज्योत अखेर मालवली. या अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली असून, रांगोळी परिसरावर शोककळा पसरली आहे.
माणकापूर येथील बसस्थानकासमोर महिनाभरापूर्वी झालेल्या डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात आधीच एका उमद्या मुलाला गमावलेल्या रांगोळी गावाला काल आणखी एक मोठा धक्का बसला. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात गेली ३५ दिवस मृत्यूशी झुंज देणारा तरुण विद्यार्थी अर्जुन रमेश मिरजे याचेही उपचारादरम्यान निधन झाले. एकाच अपघातात गावातील दोन तरुण मित्रांचा बळी गेल्याने संपूर्ण रांगोळी आणि परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

काय घडली होती घटना?

साधारण महिन्यापूर्वी रांगोळी (ता. हातकणंगले) येथील गणेश बाबासो कांबळे (वय १९), अर्जुन रमेश मिरजे आणि साहिल कुबेर कांबळे हे तिघे मित्र इचलकरंजी येथील गोविंदराव कॉलेजचे शालेय काम आटोपून दुचाकीवरून परतत होते. माणकापूरजवळ समोरून येणाऱ्या मुरुमाच्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात गणेश कांबळे याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तो आपल्या आईचा एकुलता एक आधार होता. तर अर्जुन आणि साहिल गंभीर जखमी झाले होते.

कलयुगात ‘मामाच्या’ प्रेमाचा अनोखा आदर्श

या संपूर्ण कठीण प्रसंगात नातेसंबंधांची एक वेगळी आणि कौतुकास्पद बाजू समोर आली, ती म्हणजे अर्जुनचे सख्खे मामा आणि सदलग्याचे माजी नगरसेवक राजू लक्ष्मण अमृतसमन्नवर यांच्या रूपाने. वडिलांनंतर मामा हा आईच्या प्रेमाचा दुसरा पदर असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.
अपघाताच्या पहिल्या दिवसापासून भाच्याला मृत्यूच्या दारातून खेचून आणण्यासाठी मामांनी दिवस-रात्र एक केली. सदलगा ते कोल्हापूर हे ९० किलोमीटरचे अंतर रोज मोटारसायकलने कापत, कधी मध्यरात्री तर कधी पहाटे धाव घेत त्यांनी रुग्णालयातील सर्व आघाड्या सांभाळल्या.
औषधोपचार, पोलीस ठाण्यातील पंचनामे, आर्थिक जुळवाजुळव यासोबतच भाच्याला चांगले उपचार मिळावेत म्हणून लोकप्रतिनिधी, मंत्री आणि डॉक्टरांचे उंबरठे झिजवण्यापर्यंत मामांनी प्रयत्नांची शर्थ केली.
मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. मामांची ही एकाकी आणि प्रामाणिक झुंज काल अपयशी ठरली आणि अर्जुनने जगाचा निरोप घेतला. या अपघातातून तिसरा मित्र साहिल कांबळे हा सुदैवाने बचावला असून तो जिवंत आहे.

चौकट

तरुण पिढीने आणि पालकांनी बोध घेण्याची गरज

या दुर्दैवी घटनेने समाजासमोर आणि विशेषतः तरुण पिढीसमोर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तारुण्याच्या आवेषात गाड्या भरधाव चालवण्यापेक्षा, तरुणांनी आपली ऊर्जा शिक्षण आणि करिअर घडवण्यासाठी लावणे गरजेचे आहे. आजकाल तरुण आपल्या गाड्यांच्या स्पीडोमीटरवर रील स्टार्सचे फोटो लावतात. त्याऐवजी आपल्याला जन्म देणाऱ्या आई-वडिलांचा किंवा पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या ‘मामा’सारख्या व्यक्तीचा फोटो लावावा. जेणेकरून गाडीचा काटा ६०-८० च्या पुढे जाताना आपल्या जबाबदारीची आणि मागे वाट पाहणाऱ्या कुटुंबाची जाणीव होईल.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!