
कामेरी, ता. वाळवा : नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ७ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वाळवा तालुका प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे सदस्य तथा कामेरीचे सरपंच रणजित पाटील यांनी केले.
कामेरी ग्रामपंचायतीत आयोजित शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लोकप्रतिनिधींनी अपेक्षित भूमिका घेतलेली नाही. यापूर्वी अनेक बैठका, मोर्चे व आंदोलने करूनही शासनाने या मागणीची दखल घेतलेली नसल्याने आता आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रणजित पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांनी मागणी न केलेला हा महामार्ग त्यांच्यावर लादला जात आहे. या महामार्गामुळे हजारो एकर सुपीक शेती बाधित होणार असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे हा महामार्ग तातडीने रद्द करणे आवश्यक आहे.”
यावेळी यशवंत गुलकोजचे उपाध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, “आता गप्प बसून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठा लढा उभारण्याची गरज आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यास भाग पाडू.”
बैठकीस प्रा. अनिल पाटील, डॉ. साकेत पाटील, शरद पाटील, प्रा. संजय पाटील, इंद्रजीत पाटील, पोपट पाटील, सूर्यकांत पाटील, प्रवीण जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी, व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..











