कामेरी प्रतिनिधी – प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र होत असून, कामेरी येथे आज बाधित शेतकऱ्यांचे हरकती अर्ज भरून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कामेरी शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने गावातील बाजारपेठ परिसरात या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हरकती नोंदविण्यासाठी अर्ज भरले. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया समजावून सांगत आवश्यक मार्गदर्शन केले तसेच संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत केली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, घरे आणि उपजीविकेवर परिणाम होणार असल्याची भावना व्यक्त करत प्रकल्पाला विरोध दर्शविला. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि हरकतींचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
कामेरी शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या या उपक्रमामुळे गावातील बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असून, कायदेशीर मार्गाने आपला विरोध नोंदविण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र दिसून आले.










