सांगली वृत्तसेवा – 2019 च्या महापुरात 85% गाव पाण्याखाली, महामार्ग झाला तर 100% गाव बुडणार; “आम्ही आत्महत्या करणार नाही, लढू” – भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक.
नागपूर ते गोवा प्रस्तावित ‘शक्तीपीठ द्रुतगती महामार्गा’ विरोधातील आंदोलन सांगली जिल्ह्यात तीव्र झाले आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द गावाने महामार्गाला कडाडून विरोध करत “प्रशासकीय अधिकारी बंदोबस्तात मोजणीला आले तर एक इंचही जमीन मोजू देणार नाही. वेळ पडली तर रक्त सांडू”, असा थेट इशारा दिला आहे. शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील यांनी हा इशारा दिला.
“सरकारने जो शक्तीपीठ महामार्ग करायचं ठरवलंय, अशा शक्तीपीठाची काही गरज नाही. वाळवा तालुक्यातले शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत. आमच्या ऐतवडे खुर्द गावात बरेच लोक भूमिहीन होणार आहेत. काहींची घरं जात आहेत, विहिरी जात आहेत, झाडे जात आहेत. पूर्णपणे भूमिहीन होऊन आत्महत्येची वेळ येणार आहे,” असे पाटील म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले, “नागपूर ते रत्नागिरी हायवेवर गर्दी नसताना, नवीनच नागपूर ते गोवा महामार्ग शक्तीपीठाच्या नावाने आमच्यावर लादलाय. ह्याची आम्हाला काही गरज नाही. आमचं गाव 2019 च्या महापुरात 80 ते 85 टक्के पाण्याखाली गेलतं. हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर 100 टक्के गाव पाण्याखाली जाणार आहे.
- हनुमंत पाटील यांनी स्पष्ट केले की, “आम्ही आता आत्महत्या करणार नाही. सरकारला हात जोडून विनंती करतोय. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन थांबलोय. पण तरीसुद्धा जर मोजमाप करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी बंदोबस्तात ऐतवडे खुर्दमध्ये आले तर आम्ही एक एक इंचही जमिनीची मोजणी होऊ देणार नाही. वेळ पडली तर आम्ही रक्त सांडू. जे अधिकारी येणार आहेत त्यांनी विचार करून गावात यावं.”










