संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी
चंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सडेगुडवळे येथे एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.सदर महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याची प्राथमिक माहिती असून, अज्ञात आरोपीने तिचा गळा आवळून अथवा गुदमरवून खून केल्यानंतर तिची ओळख पटू नये तसेच पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सडेगुडवळे गावच्या हद्दीत बेळगाव–वेंगुर्ला मुख्य मार्गापासून पांडुरंग सुतार यांच्या खडी क्रशरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आतील बाजूस, अरुण पांडुरंग काकडे यांच्या मालकीच्या शेतात हा मृतदेह आढळून आला.मृतदेह अर्धवट जळालेल्या तसेच कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
मृतदेहाच्या डाव्या हातात पांढऱ्या धातूचे ब्रेसलेट असून, अनामिका बोटात अंगठी आढळून आली आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने महिलेची ओळख पटविण्यास अडचणी येत आहेत. अज्ञात महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू करण्यात आला आहे.
सडेगुडवळे येथील पोलिस पाटील सौ.शीतल लाडू गावडे यांनी दिलेल्या माहितीवरून चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १०३(१) व २३८ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे.या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक एन.आर.चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अज्ञात महिलेची ओळख पटविणे तसेच तिच्या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. परिसरातील माहिती, उपलब्ध पुरावे आणि इतर शक्य धागेदोरे तपासून या गंभीर घटनेचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे सडेगुडवळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










