Edition

इस्रोच्या श्रीहरिकोटा केंद्राला प्रिन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

लॉन्चिंग पॅड, मिशन कंट्रोल रूमसह डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ऐतिहासिक रॉकेट चाचणी नियंत्रण कक्षाला दिली भेट.

सेलू : दि. १८ नोव्हेंबर रोजी विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि संशोधनाची प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेलूच्या १९ विद्यार्थ्यांनी आज, दि. १८ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) केंद्राला शैक्षणिक भेट दिली.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे या विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा येथील प्रशिक्षण व शैक्षणिक भेटीसाठी निवड झाली होती. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील कार्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि अंतराळ मोहिमांविषयी प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्याची अनोखी संधी मिळाली.या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांनी इस्रोच्या रॉकेट लॉन्चिंग पॅड, मिशन कंट्रोल रूम तसेच भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी रॉकेटच्या चाचणीसंदर्भात काम केलेल्या ऐतिहासिक नियंत्रण कक्षालाही भेट दिली. देशाच्या अंतराळ संशोधनातील महत्त्वपूर्ण ठिकाणे प्रत्यक्ष पाहताना विद्यार्थ्यांना रॉकेट प्रक्षेपणाची प्रक्रिया, अंतराळ मोहिमांचे नियोजन आणि नियंत्रण याविषयी जाणून घेता आले. डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक योगदानाची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांसाठी ही भेट विशेष प्रेरणादायी ठरली.
या दौऱ्यात श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे रोबोटिक्स शिक्षक शिवशंकर सोळंके आणि रोबोटीक शिक्षिका मानसी यादव विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींची ओळख व्हावी तसेच त्यांच्या मनात संशोधनाची जिज्ञासा निर्माण व्हावी, या दृष्टीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.इस्रोसारख्या देशाच्या प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्थेला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुस्तकांमधून शिकलेल्या अंतराळ विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवकल्पनांची प्रेरणा मिळाली.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक उपक्रमात यश मिळवून इस्रोच्या श्रीहरिकोटा केंद्रापर्यंत मजल मारणे ही सेलूच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.या यशस्वी शैक्षणिक उपक्रमाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.प्रिन्स स्कूलच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाची नवी क्षितिजे खुली झाली असून, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वैज्ञानिक कार्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!