डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी जिल्ह्यात A+ श्रेणी मिळविणारी एकमेव शाळा; SCERT कडून ‘रोल मॉडेल’ म्हणून गौरव.
सेलू : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलूच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ने राज्यातील एकूण ३० प्राथमिक व ३० उच्च प्राथमिक शाळांची निवड करून आयोजित केलेल्या प्रशिक्षण प्रक्रियेत प्रिन्स इंग्लिश स्कूलने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने विशेष स्थान निर्माण केले आहे.शाळेने SQAAF मूल्यांकनात 512 पैकी 468 गुण स्वयंमूल्यांकनात, तर बाह्य मूल्यांकनात 470 गुण प्राप्त करून A+ श्रेणी संपादन केली आहे. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात A+ दर्जा प्राप्त करणारी प्रिन्स इंग्लिश स्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे.या यशामागे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याची तळमळ आणि नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरला आहे. बदलत्या शैक्षणिक गरजांचा विचार करून आधुनिक शिक्षणपद्धती, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, शिक्षकांचे प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण अध्यापन आणि शाळेच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी विशेष भर दिला आहे._
प्रिन्स इंग्लिश स्कूल ही केवळ नियमित अध्यापनापुरती मर्यादित न राहता शासनाच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविणारी शाळा आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजना, स्पर्धा, प्रशिक्षण, विज्ञानविषयक उपक्रम आणि गुणवत्ता विकास कार्यक्रमांमध्ये शाळेचे विद्यार्थी व शिक्षक सातत्याने सहभागी होतात. प्रत्येक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून त्यातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा आणि शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न शाळेमार्फत केला जातो.
SCERT च्या मार्गदर्शनानुसार प्रिन्स इंग्लिश स्कूल ही आता परभणी जिल्ह्यातील इतर शाळांसाठी ‘रोल मॉडेल स्कूल’ म्हणून पुढे येत आहे. शाळेने मिळविलेल्या यशस्वी अनुभवांचा उपयोग इतर शाळांना SQAAF मूल्यांकन, शालेय गुणवत्ता वृद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात येणार आहे.याच अनुषंगाने SCERT पुणे येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत शाळेचे शिक्षक श्री. नारायण चोरे यांनी मार्गदर्शक म्हणून सहभाग नोंदविला. त्यांनी SQAAF मधील मानके ५१ ते ५५ अंतर्गत भौतिक व प्रशासकीय सुविधांच्या अनुपालन अहवालाचे सादरीकरण करून शाळेतील सुविधा, नियोजन आणि गुणवत्ता विकासाच्या कार्यपद्धतीची माहिती उपस्थित शाळा प्रतिनिधींना दिली.या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, तसेच SQAAF चे काम पाहणारे बालाजी बामणे,संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी देत शैक्षणिक क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी प्रिन्स इंग्लिश स्कूलची वाटचाल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.










