सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना आंदोलनात सहभागी होण्याचे संदीप राजोबा यांचे आवाहन.
उसाला प्रतिटन साडेचार हजार रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाक्यावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनाचा अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कडाक्याच्या थंडीत महामार्गावरच शेतकरी झोपले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने किणी टोलनाक्यावर उपस्थित राहावे, असे आवाहन संदीप राजोबा यांनी केले आहे.
काल सकाळी ११ वाजल्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. पहाटे साडेपाच वाजेपर्यंतही आंदोलनावर तोडगा निघालेला नसल्याचे राजोबा यांनी सांगितले. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेशा अंथरूण-पांघरुणाचीही सोय नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि सामाजिक जाणीव असलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करताना राजोबा म्हणाले की, जिल्ह्यात ऊसतोड रोखण्यात आपल्याला यश आले नसले, तरी उसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी किणी येथे थंडीत रस्त्यावर झोपून संघर्ष करत आहेत. त्यांच्या लढ्याला साथ देणे ही आपली जबाबदारी आहे.
सरकारच्या भूमिकेवर टीका करत त्यांनी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे म्हटले. शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली नाही, तर त्यांना अपेक्षित दर मिळणार नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी आजच बहुसंख्येने किणी टोलनाक्यावर उपस्थित राहून आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन संदीप राजोबा यांनी केले.
उसाच्या पहिल्या हप्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याने किणी टोलनाक्यावरील आंदोलनाकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.










