Edition

नागावमध्ये १२ हजारांची लाच घेताना खासगी इसम रंगेहात जेरबंद! तलाठ्यांच्या नावाने १५ हजारांची मागणी; तडजोडीनंतर १२ हजार रुपये स्वीकारताना एसीबीची कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी मिनाज सनदी : सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र दुरुस्ती करून तक्रारदाराचे नाव नोंदवून देण्याच्या कामासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोल्हापूर पथकाने नागाव (ता. हातकणंगले) येथे सापळा रचून एका खासगी इसमाला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात आणखी एका खासगी उमेदवाराचा सहभाग निष्पन्न झाला असून, दोघांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे ४० वर्षीय कारखानदार असून, त्यांची वडिलोपार्जित जमीन नागाव येथे आहे. संबंधित जमिनीच्या गटामध्ये क्षेत्राची चुकीची नोंद झाल्याने ती दुरुस्त करून सातबारा उताऱ्यावर योग्य क्षेत्र नोंदविण्यासाठी त्यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी नागाव तलाठी कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. तसेच सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नोंदविण्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रेही कार्यालयात सादर केली होती.
या कामाबाबत तक्रारदार यांनी नागाव येथील तलाठ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी त्यांना अवधूत रामचंद्र लोंढे या खासगी उमेदवाराला भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार अवधूत लोंढे यांना भेटले असता, तलाठी मॅडम यांच्यामार्फत क्षेत्र दुरुस्ती करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणीत अवधूत रामचंद्र लोंढे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच खासगी इसम सूरज कुंतीनाथ सोळांकुरे यानेही तलाठी कार्यालयामार्फत काम करून देण्याचे आश्वासन देत तडजोडीअंती १२ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईचे नियोजन केले. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताना सूरज कुंतीनाथ सोळांकुरे (वय ४२, रा. शिवाजी चौक, नागाव, ता. हातकणंगले) याला पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणातील अवधूत रामचंद्र लोंढे (वय ३७, खासगी उमेदवार, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, नागाव) यांचाही सहभाग निष्पन्न झाला आहे.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे, जिल्हा कोल्हापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक :
सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांनी काम पाहिले. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले. या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास माने, सचिन पाटील, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल संगिता गावडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदिप पवार, वैभव खोत आणि प्रशांत दावणे यांचा समावेश होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे महसूल कार्यालयातील कामांसाठी मध्यस्थांमार्फत पैशांची मागणी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

error: Content is protected !!