मुंबई वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे. सोमवारी दिल्लीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ या सहा ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बंद दाराआड भेट घेतली. विशेष म्हणजे, या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार अनुपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण होऊ नये आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे, अशी ठाम मागणी या नेत्यांनी अमित शहांकडे केल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच, पुणे पदवीधर मतदारसंघाची हक्काची जागा भाजपला सोडल्यामुळे आणि पक्षातील निर्णयप्रक्रियेबाबत नेत्यांमध्ये नाराजी असल्याचेही बोलले जात आहे.
या अचानक झालेल्या दिल्ली भेटीमुळे पक्षात सुनेत्रा पवार समर्थक आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखालील मूळ नेत्यांचा गट असे दोन तट पडल्याचे स्पष्ट झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता अर्थखाते आणि सत्तेतील वाट्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










