सांगली, दि. २ (प्रतिनिधी) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असून, याला ‘शेतकऱ्यांचा एल्गार’ असे स्वरूप देण्यात आले आहे.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असताना ऊस दराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, शेतीच्या मशागतीचा खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च यांचा विचार करून ऊस उत्पादकांना रास्त दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर ऊस दराच्या प्रश्नाकडे शासन आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी होणाऱ्या या आंदोलनात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.










