विशाल क्रांती वृत्तसेवा – दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १० रुपयांची वाढ केली असून, १ नोव्हेंबरपासून ही नवी दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता २ हजार ८२० रुपयांवर पोहोचली आहे. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीचा फटका हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, मिठाई विक्रेते तसेच खाद्यपदार्थ व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील ऊर्जा दरांमधील चढ-उतार आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील विस्कळीतपणामुळे एलपीजीच्या किमतीत यापूर्वीही मोठे बदल झाले आहेत. फेब्रुवारी ते जूनदरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत तब्बल १ हजार ३७३ रुपयांची वाढ होऊन दर १ हजार ७४०.५० रुपयांवरून ३ हजार ११३.५० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये दरात कपात करण्यात आली होती.
दरम्यान, सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर ९४२ रुपये कायम ठेवण्यात आला आहे. ताज्या दरबदलात घरगुती गॅसच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. मार्च ते जूनदरम्यान मात्र घरगुती गॅसच्या दरात प्रति सिलिंडर ८९ रुपयांची वाढ झाली होती.
पेट्रोल आणि डिझेलचे दरही सध्या स्थिर आहेत. मे महिन्यात प्रति लिटर सुमारे ७.५० रुपयांची वाढ झाल्यानंतर त्यात नव्याने बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यावसायिक गॅस महागला असला तरी घरगुती ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.










