अंगणवाडी केंद्र नसलेल्या भागांतील महिलांनाही दिलासा; अर्जापासून लाभ वितरणापर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन
राज्यातील मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यामुळे अर्ज नोंदणी, कागदपत्रांची छाननी, मंजुरी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
शासकीय प्रक्रियांच्या पुनर्रचनेअंतर्गत अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे. विशेषतः अंगणवाडी केंद्र कार्यरत नसलेल्या भागांतील लाभार्थ्यांना अर्ज करताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. राज्यातील कोणत्याही भागातील पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जाची सद्यस्थितीही पोर्टलवर पाहता येणार आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. योजनेअंतर्गत लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे.
२ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना पहिला लाभ
आतापर्यंत राज्यातील २ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे. ऑनलाइन अर्ज सुविधेमुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.








