
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
या बैठकीला रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
साखरेला प्रतिकिलो ५५ रुपये आधारभूत किंमत मिळावी, इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये करण्यात यावा, दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी, साखर कारखान्यांमधील वजनकाटे ऑनलाइन करण्यात यावेत. या मागण्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले. तसेच, येत्या आठवडाभरात राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने नकोत, तर ठोस निर्णय हवेत,अशी ठाम भूमिका आमदार सदाभाऊ खोत यांनी मांडली. या मागण्यांवर लवकरात लवकर योग्य तोडगा न निघाल्यास सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत, सहकार सचिव प्रवीण दराडे, साखर आयुक्त संजय कोलते, शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, भाजपा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष भगवान काटे व महेश खराडे, भाजपा नेते सावकार मादनायक, जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अनिल बेनाडे, सदाशिव कुलकर्णी तसेच शिवसेना शेतकरी सेनेचे सरचिटणीस प्रल्हाद इंगोले उपस्थित होते.










