कोल्हापूर | दि. १४ ऑक्टोबर
कोल्हापूर जिल्ह्यात आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक तसेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वय बैठकीत मतदान केंद्रांवरील सुविधा, मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, मतदान साहित्याचे वितरण आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात २८२ मतदान केंद्रे
पदवीधर मतदारसंघासाठी २१२, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७० अशी एकूण २८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांसाठी ७७६ मतपेट्यांची आवश्यकता असून, सध्या ५२७ मतपेट्या उपलब्ध आहेत. उर्वरित मतपेट्यांची व्यवस्था अन्य जिल्ह्यांकडून करण्यात येणार आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार ५६२, तर शिक्षक मतदारसंघासाठी १२ हजार २९९ मतदार आहेत. करवीर तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी सर्वाधिक ५७, तर शिक्षक मतदारसंघासाठी १२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
मतपत्रिकांच्या वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मतपत्रिकेद्वारे होणार असल्याने मतपत्रिकांची सुरक्षित वाहतूक आणि हाताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे येथे छपाई करण्यात येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या १ लाख ४६ हजार आणि शिक्षक मतदारसंघाच्या १८ हजार मतपत्रिका जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मतदान २३ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या आणि संबंधित लखोटे कसबा बावडा, रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामातील ‘ए’ गोदामात सुरक्षितपणे आणण्यात येणार आहेत.
भरारी पथके आणि पोलीस यंत्रणा सतर्क
निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात २४ भरारी पथके, दोन व्हिडिओ व्ह्यूइंग पथके, दोन व्हिडिओ सर्व्हेलन्स पथके आणि राखीव पथकांसह आठ स्थिर सर्व्हेलन्स पथके कार्यरत राहणार आहेत.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मतदान केंद्रांवर केवळ नियुक्त अधिकारी-कर्मचारी आणि अधिकृत मतदारांनाच प्रवेश देण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. मतदान केंद्रांवरील सुरक्षा, मतदारांची ओळख पडताळणी आणि मतदान साहित्याच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येणार आहे.
बैठकीला अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, गोकुळ निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी युसुफ शेख व प्रेमदास राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एकूणच, पदवीधर, शिक्षक आणि गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी सुरू केली असून, सुरक्षित व सुरळीत निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.










