
कोल्हापूर दि. १२ : डोंगरवाडी ता. वाळवा येथील अनुसूचित जातीतील रविंद्र सकटे व महादेव सकटे कुटुंबीयांच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच सकटे कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांना प्रत्यक्ष भेटून रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, किरण माने, रवींद्र सकटे, महादेव सकटे, रोहित सकटे यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे.
डोंगरवाडी येथील रविंद्र सकटे व महादेव सकटे यांच्या पूर्वजांना सन १८६१ मध्ये सुमारे साडेअकरा एकर शेतजमीन मिळाली होती. या जमिनीच्या महसुली अभिलेखातील ७/१२ उताऱ्यावर भोगवटा क्रमांक २ व मिराशी कुळ म्हणून त्यांच्या नोंदी आहेत. तेंव्हापासून आजपर्यंत सकटे कुटुंबीयांचा सदर जमिनीवर ताबा व वहिवाट आहे. तसेच शासनाने या जमिनीवर विहिरी व घरे बांधून दिली असून, सध्या सकटे कुटुंबीय या ठिकाणी वास्तव्यास आहेत. सदर जमिनीचा वाद ईश्वरपूर येथील न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, जमिनीच्या हस्तांतरणास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही चिखुर्डे, ता. वाळवा येथील संबंधित व्यक्तींने सकटे कुटुंबीयांच्या अशिक्षितपणाचा व कायद्याविषयीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन महसूली अधिकाऱ्यांना हाताशी धरून, कथित बोगस सह्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावल्याची तक्रार सकटे कुटुंबीयांनी यापूर्वी कुरळप पोलिसांकडे केली होती. मात्र तक्रारीतील आरोपांचे स्वरूप फौजदारी असतानाही त्याकडे दिवाणी वाद म्हणून पाहून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. उलटपक्षी, पीडित सकटे कुटुंबीयांवरच कुरळप पोलिसांनी एफआयआर क्रमांक १२६/२०२६ दाखल करून अन्यायकारक कारवाई केली आहे. या प्रकारामुळे सकटे कुटुंबीयांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अविश्वास निर्माण झाला असून, समाजातही चुकीचा संदेश गेला आहे.
तेंव्हा…
1) सदर प्रकरणाची स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी नेमून निष्पक्ष चौकशी करून तक्रारीतील तथ्यांच्या आधारे दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.
2. कुरळप पोलिसांत सकटे कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेला एफआयआर क्र. १२६/२०२६ रद्द करण्यात यावा.
3. पिडित सकटे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावा.
अशी मागणीही करण्यात आली आहे.
त्यावर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनी तक्राराची व निवेदनाची तत्काळ दखल घेऊन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना, स्वतंत्र पोलीस अधिकारी नेमून सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना फोनवरून दिल्या आहेत.
मागण्या मान्य न झाल्यास दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने “बेमुदत धरणे आंदोलन” करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.










