

चिकुर्डे–करंजवडे रस्त्यावर चारचाकीसह विहिरीत कोसळलेल्या ऐतवडे बुद्रुक येथील धनंजय सुभाष शेटे(वय ४१) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल ४८ तासांच्या शोधानंतर गुरुवारी कारसह त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. सुमारे सात तास चाललेल्या या शोधमोहीमेत कुरळप पोलिसांसह स्थानिक नागरिक, पाणबुडे आणि बचाव पथकाने अथक प्रयत्न केले.
धनंजय शेटे हे वारणानगर येथून स्वतःच्या चारचाकीने ऐतवडे बुद्रुक येथील आपल्या घरी निघाले होते. मंगळवारी (दि. ६) रात्री त्यांनी कुटुंबीयांना, “दहा मिनिटांत घरी पोहोचतो,” असा फोन केला होता. मात्र, त्यानंतर ते घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी चिकुर्डे ते करंजवडे रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीजवळ अपघाताच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे धनंजय शेटे हे चारचाकीसह विहिरीत कोसळले असावेत, असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर कुरळप पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत शोधमोहीम सुरू केली.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत, सुमारे मध्यरात्रीपर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र, विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने शोधमोहीमेत मोठे अडथळे निर्माण झाले. गुरुवारी सकाळी मड पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, पाण्याची पातळी अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याने कोल्हापूर येथील पाणबुड्याला पाचारण करण्यात आले.
पाणबुड्याने सुमारे ५० फूट खोल पाण्यात उतरून कारचा शोध घेतला. कार सापडल्यानंतर तिला दोर बांधण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून कार विहिरीबाहेर काढण्यात आली. कार बाहेर काढल्यानंतर धनंजय शेटे यांचा मृतदेहही आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धनंजय शेटे हे वारणानगर येथील वारणा संकुलात नोकरीस होते. मंगळवारी कामावरून घरी परतत असताना त्यांच्या कारला हा भीषण अपघात झाला. धनंजय हे मनमिळाऊ व होतकरू स्वभावाचे असल्याने ऐतवडे बुद्रुकसह परिसरात त्यांचा मोठा परिचय होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई असा परिवार आहे. कुटुंबातील ते एकमेव कर्ते व्यक्ती असल्याने त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
घटनास्थळी सकाळपासून जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील (कामेरी), जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील तसेच कुरळप पोलीस ठाण्याचे सपोनि भरत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने, पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शोधमोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांनी बचाव कार्यात सहकार्य केले.
अपघाताची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तब्बल ४८ तासांच्या प्रतीक्षेनंतर धनंजय शेटे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने ऐतवडे बुद्रुक आणि परिसरात शोककळा पसरली आहे.











