डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू–पाथरी उड्डाणपुलाच्या आराखड्यात जोडरस्ता समाविष्ट करण्याची मागणी.
सेलू : सेलू–पाथरी रेल्वे गेटवर प्रस्तावित चारपदरी उड्डाणपुलाच्या आराखड्यात रवळगावकडे जाणारा महत्त्वाचा जोडरस्ता समाविष्ट न केल्यास १५ ते २० गावांतील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या आराखड्यात रवळगावकडे जाणाऱ्या वळण रस्त्याचा समावेश करून त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी मराठा संग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव कोकाटे यांनी केली आहे.
सेलू–पाथरी रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर रवलगावकडे जाणारा जोडरस्ता सध्याच्या आराखड्यात समाविष्ट नसल्याची बाब समोर आली आहे. उड्डाणपूल उभारला जात असताना नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांसह शेतकरी, महिला, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आराखड्यात रस्ता घ्या, मगच काम पुढे न्या. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित रस्त्याचा आराखड्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या एका पट्ट्यात या जोडरस्त्याचा समावेश केल्यास परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळता येणार असल्याचे सांगण्यात आले.यासंदर्भात रवळगाव येथील भीमराव कोकाटे आणि विठ्ठल फेंड यांनी मुंबई येथे जाऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडेही मागणीचे निवेदन देण्यात आले. रेल्वे विभाग व संबंधित यंत्रणांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रवळगावकडे जाणारा जोडरस्ता उड्डाणपुलाच्या आराखड्यात समाविष्ट करून कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थी, शेतकरी, रुग्णांसाठी जीवनवाहिनी रवळगावकडे जाणारा हा मार्ग परिसरातील १५ ते २० गावांसाठी दैनंदिन दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचा वापर शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. प्राथमिक व माध्यमिक शाळांसह महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे.
महिलांना रुग्णालयात जाणे, आजारी व्यक्तींना उपचारासाठी नेणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका जाण्यासाठीही या मार्गाची आवश्यकता असते. त्यामुळे रवळगावचा जोडरस्ता केवळ एक रस्ता नसून परिसरातील अनेक गावांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा दुवा आहे. उड्डाणपुलाचे काम करताना हा मार्ग बंद होणार नाही, याची दक्षता घेऊन आराखड्यात आवश्यक बदल करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.











