चंदगड प्रतिनिधी – चंदगड तालुका हा नाट्य, सिनेमा आणि रंगभूमीवरील कलाकारांची खाण म्हणून ओळखला जातो. मात्र चंदगड शहर किंवा तालुक्यात कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी अद्यापही सुसज्ज नाट्यगृह उपलब्ध नाही. ही कमतरता दूर करण्यासाठी चंदगड येथे सर्व सोयींनी युक्त नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आल्याची माहिती चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी दिली.
चंदगड येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नाट्य कलाकारांच्या सहभागाने ग्रामीण नाट्य कलाकारांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी चंदगडमध्ये नाट्यगृहाची गरज अधोरेखित केली.
“जीवन जगावे, पण कसे जगावे हे कला शिकवत असते. या कलेमुळे माणसाचे जीवन घडते,” असे सांगत कला जिवंत ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
चंदगड येथे शासनाच्या माध्यमातून नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करता यावे आणि त्यांना योग्य मानधन मिळावे, यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी दिली.
नाट्यगृह उभारल्यास चंदगड तालुक्यातील स्थानिक नाट्य कलाकार, रंगभूमीवरील कलाकार तसेच विविध सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चंदगडच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या कलेला प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.











