डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू तालुक्यातील वालूर येथील प्राचीन आणि ऐतिहासिक बारव (स्टेपवेल) दीपांच्या लखलखत्या प्रकाशाने उजळून निघाली. ‘एक दिवस आशिर्वादाचा, विकसित भारताच्या संकल्पनेचा’ या उपक्रमांतर्गत या बारवमध्ये भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.
बारवच्या प्रत्येक पायरीवर, प्रत्येक कोनाड्यात पणत्या लावण्यात आल्या होत्या. सर्पाकार आकाराच्या या खोल बारवमध्ये शेकडो दिव्यांच्या प्रकाशामुळे एक अद्भुत आणि नयनरम्य दृश्य तयार झाले होते. अंधारात लख्ख उजळलेली बारव पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.ही बारव केवळ पाण्याचा स्रोत नसून, चालुक्य-कालीन स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे. अशा ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व्हावे आणि युवकांमध्ये वारशाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.या दीपोत्सवामुळे वालूरच्या ऐतिहासिक बारवाला नवी ओळख मिळाली असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही या स्थळाचे महत्त्व वाढले आहे.











