
संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी – कानूर बुद्रुक : कानूर बुद्रुक गावातील गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झाली. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत बेंजोच्या तालावर तरुणाईसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीचा उत्साह आणखी वाढला.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरवणूक निघाल्यानंतर बेंजोच्या तालावर युवकांनी जल्लोष केला. गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण गावाचा परिसर दुमदुमून गेला. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. बेंजोच्या तालावर तरुणाईचा उत्साह आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे विसर्जन मिरवणुकीला विशेष रंगत आली.
गणरायाचे विसर्जन करताना ग्रामस्थांनी भक्तिभावाने आरती करून बाप्पाचे दर्शन घेतले. आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात कानूर बुद्रुक गावातील गणपती विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.











