संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी – कोल्हापूर : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि भारत सरकार यांच्यातील चर्चेत ठोस तोडगा न निघाल्याने देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय संपाला कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संपामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुमारे ३६० शाखांमधील कामकाजावर परिणाम झाला. चेक वटवणे, रोख व्यवहार, विविध बँकिंग सेवा तसेच इतर नियमित व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
संपाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेसमोर बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. निदर्शनामुळे काही काळ परिसरात वातावरण चांगलेच दुमदुमून गेले होते.
बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला होता. संपामुळे जिल्ह्यातील बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम झाला असून, सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारांवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला. चेक क्लिअरिंग, रोख देवाणघेवाण आणि इतर बँकिंग सेवांवर त्याचा थेट परिणाम जाणवला.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारसोबत मागण्यांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र, चर्चेत अपेक्षित तोडगा न निघाल्याने संपाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवत संप यशस्वी करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, लक्ष्मीपुरी शाखेसमोर झालेल्या निदर्शनात जिल्ह्यातील विविध बँकांतील कर्मचारी, अधिकारी, बँक मित्र तसेच संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांनी हातात फलक घेत आणि घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात जिल्हा कन्हेरचे काँ. विकास देसाई, काँ. अक्षय स्वामी, गणेश कुडाळकर, सुशांत मुळीक , चंद्रकांत कुमार, संतोष गावडे , त्रिशूल देसाई, जयदीप कवडे, धीरज कुराडे, महिंद्र टाटे, जीवन करवीरकर, राहुल येडगुळे, प्रशांत ठोसर, प्रफुल्ल जाधव, अनिता जाधव, सागर कांबळे, निशांत गौतम, अविराज गवळी यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी व कर्मचारी सहभागी झाले होते.
संपामुळे बँकिंग व्यवहार काही प्रमाणात विस्कळीत झाले असले तरी नागरिकांनी डिजिटल बँकिंग, एटीएम आणि उपलब्ध ऑनलाइन सेवांचा वापर करून दैनंदिन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोख व्यवहार आणि चेकशी संबंधित कामांसाठी बँक शाखांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना संपाचा फटका बसला.











