गांधीनगर/प्रतिनिधी
उदय साळुंखे
गडमुडशिंगी ता. करवीर ग्रामपंचायत हद्दीतील भाग क्रमांक तीन मधील ‘गंगा निवास’ जवळच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी फजिती होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही, परिणामी अनेक वाहने अचानक या खड्ड्यांमध्ये आदळून अपघातांचा धोका वाढला आहे.
जवळच असलेल्या गंगा निवास ते गांधीनगर मार्केट परिसरातील या रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. वाहन चालवणे जीवघेणे ठरत असून, साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक आणि शाळकरी मुले ये-जा करतात. मात्र प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.











