डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि. ४ सप्टेंबर रोजी एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सेलू येथे दप्तरविना शाळा उपक्रमांतर्गत करिअर डिस्कव्हरी प्रोग्राम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक कौशल्यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कुंभारकाम, वेल्डिंग, मेकॅनिकल (इस्त्री, मिक्सर, शिवण मशीन दुरुस्ती), फ्रिज व टॅबलेट मशीन, सिव्हिल इंजिनिअरिंग (घर बांधकाम व रोड मोजमाप), प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन आदी विषयांवरील प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ही शिक्षण प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी आपण मंत्रालय स्तरावर सादरीकरण केले आहे. विद्यार्थी केवळ मेडिकल व इंजिनिअरिंगपुरते मर्यादित न राहता विविध कौशल्याधारित क्षेत्रांकडे वळले पाहिजेत. येणारे युग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे कौशल्य विकास असणे काळाची गरज आहे. शाळेत लवकरच अत्याधुनिक स्किल डेव्हलपमेंट लॅब उभारण्यात येणार असून त्यासाठी करिअर डेव्हलपमेंट कार्यक्रम सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुबोध हिवराळे, अनिल कुमार, अब्दुल बाशा व मीरा मिरांडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात अपूर्वा पॉलिटेक्निक, सेलू येथील प्राध्यापक व अभियंत्यांनी विविध तांत्रिक क्षेत्रांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आदित्य फार्मसी कॉलेज येथील प्राध्यापकांनी फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध कार्यशाळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्यक्ष कौशल्यांचा अनुभव घेतला.










