शिराळा, प्रतिनिधी : वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजना भाग एक, टप्पा तीन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची आमदार सत्यजित देशमुख यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
वाकुर्डे बुद्रुक-बादेवाडी येथील पंप हाऊसची पाहणी करताना जमिनी संपादित होऊनही अद्याप मोबदला मिळाला नसल्याचा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. याबाबत जलसंपदा विभागाने सर्व्हे करून शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून, महामंडळाकडे पाठपुरावा करून चालू खरेदी दरानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाही आमदार देशमुख यांनी दिली.
बादेवाडी येथील कालवा गळतीचे काम महिनाभरात सुरू करून युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शिरशी येथील महिंदवस्ती, पूर्व कालेखिंड व भैरवदरा परिसरातील लाभक्षेत्राची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार करून मायनर पाचमध्ये सुधारित प्रापणसूचित समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नुकसानभरपाईतून वगळलेल्या काही गट क्रमांकांबाबत तक्रारींची दखल घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
करमाळे येथील स्मशानभूमी ओढ्यामुळे सिंचनापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाढीव पाइप टाकून ७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या नियोजित जागेचीही पाहणी आमदार देशमुख यांनी केली.तसेच भटवाडी व बेलदारवाडी येथील क्षेत्र ओलीताखाली येण्यासाठी सर्व्हे करा असे आवाहन केले.
यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, ए.एन. मोरे, डी.एन. चव्हाण, उपअभियंते अक्षयकुमार खराडे, विजय आंबोळे, सतीश चव्हाण, एस.जे. पाटील, एस.एस. चव्हाण, आर.बी. पाटील, शाखा अभियंता विक्रम सावंत, कनिष्ठ अभियंते केदार पवार, अनिकेत सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी. पाटील, तानाजी कुंभार, वाकुर्डे सरपंच आनंदा कुंभार, शिरशी सरपंच स्मिताताई भोसले यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ – वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजना भाग एक टप्पा तीन ची पाहणी करताना आमदार सत्यजित देशमुख.











